Wednesday, October 27, 2010

स्‍पर्शज्ञान- ब्रेल लिपीतील ज्ञानोपासना...

ब्रेल लिपीतील ज्ञानोपासना
     १५ ऑक्‍टोबर १९९८... वेळ सकाळी ११ वाजताची... पुण्‍याच्‍या कोरेगाव पार्कमधील अंध मुलांच्‍या शाळेतील पहिल्‍या मजल्‍यावरील प्रशस्‍त दालनात अंधशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी शांतपणे ऐकत बसली होती. समोर उभ्‍या असलेल्‍या उज्‍ज्‍वला नाईकनवरेची बोटे आपल्‍या दृष्‍टीला को-या वाटणा-या पांढ-या शुभ्र कागदांवरील उठावदार ठिपक्‍यांवरून झरझर फिरत होती. ‘‘उठा मुलांनो उठा.. उद्याचा सूर्य तुमच्‍यासाठी.. हसा मुलांनो हसा’’ ही ज्‍येष्‍ठ कवियत्री संजीवनी मराठेंची कविता तिने वाचली आणि ‘स्‍पर्शगंध’ या ब्रेल लिपीतील पहिल्‍या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले आणि अंधांना दिवाळी अंकांतील साहित्‍याचा आनंद लुटण्‍याची संधी मिळण्‍यास सुरुवात झाली.
     ‘स्‍पर्शगंध’ हा ब्रेल लिपीतील दिवाळी अंक काढण्‍याची कल्‍पना मला माझ्या ‘स्‍वातंत्र्याची यशोगाथा’ या ८८ अंध कलाकारांच्‍या विश्‍वविक्रमी नाटकातील कलावंतांच्‍या सहवासात असताना सुचली. १९९७ साली देश स्‍वातंत्र्याचा सुवर्ण महोत्‍सव साजरा करत असताना समाजातील एक मोठा घटक केवळ ब्रेल लिपीतील अभ्‍यासक्रमाशिवाय इतर पुस्‍तके फारशी तयार होत नसल्‍याने साहित्‍याचा आनंद लुटण्‍यापासून वंचित होता हे धक्‍कादायक होते. माझ्या त्‍या अंध कलाकारांची आणि त्‍यांच्‍याबरोबर इतर दृष्टिहीनांचीही वाचनाची भूक भागवण्‍यासाठी मी ‘स्‍पर्शगंध’ हा ब्रेल लिपीतील दिवाळी अंक सुरू केला. तीन वर्षांनंतर ‘स्‍पर्शगंध’चा ‘पु. ल. देशपांडे विशेषांक’ काढला. या अंकात केवळ पुलंचे साहित्‍य देण्‍यात आले होते आणि विशेष म्‍हणजे त्‍या साहित्‍याची निवड करण्‍यासाठी स्‍वतः सुनीताबाईंनी मला मदत केली होती. स्‍पर्शगंध दिवाळी अंक महाराष्‍ट्रातील सर्व अंधशाळा व संस्‍थांना भेट म्‍हणून पाठवण्‍यात आले. त्‍याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
     माझ्या अंध वाचकांचं म्‍हणणं असं होतं की वर्षातून केवळ एक दिवाळी अंक वाचून त्‍यांचं समाधान होत नव्‍हतं. मी दरमहा नियमित ब्रेल लिपीत काहीतरी नियतकालिक सुरू करावे अशी त्‍यांची मागणी होती. म्‍हणून ब्रेल लिपीतील पाक्षिक वृत्‍तपत्र सुरू करण्‍याचा धाडसी निर्णय मी घेतला. नावही सुचले होते.. ‘स्‍पर्शज्ञान’... स्‍पर्शाद्वारे मिळणारे ज्ञान. दर पंधरा दिवसांनी नियमितपणे पाक्षिक प्रकाशित करायचे तर माझ्याकडे स्‍वतःची ब्रेल छपाई यंत्रणा असणे गरजेचे होते आणि त्‍यासाठी पैसाही खूप लागणार होता. त्‍यामुळे मी स्‍पर्शगंध दिवाळी अंकाचे प्रकाशन थांबवले आणि पैसे जमवण्‍यास (बचत करण्‍यास) सुरुवात केली. डिसेंबर २००७ मध्‍ये साडेचार लाख रुपये खर्चून अत्‍याधुनिक ब्रेल छपाई यंत्रणा उभी केली. यात प्रगत संगणकीय तंत्रज्ञान वापरून कागदाच्‍या दोन्‍ही बाजूला ब्रेल लिपीतील उठावांची छपाई करता येते. एकीकडे ही जमवाजमव चालू असतानाच दिल्‍लीच्‍या ‘रजिस्‍ट्रार ऑफ न्‍यूजपेपर्स फॉर इंडिया’ यांच्‍याकडून ‘स्‍पर्शज्ञान’ या नावाने पाक्षिक वृत्‍तपत्र सुरू करण्‍यासाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळविले.
     ही सर्व तयारी तर झाली, पण आता ‘स्‍पर्शज्ञान’ पाक्षिकाचे नियमित अंक सुरू करण्‍यासाठी निधीची आवश्‍यकता होती. त्‍यासाठी डोळस आणि सामाजिकतेचे भान बाळगणा-या लोकांनी एका अंकासाठी वर्षभर लागणा-या कागदाचा खर्च रु. ९६०/- वार्षिक वर्गणी म्‍हणून भरून हे पाक्षिक अंध व्‍यक्तीस किंवा संस्‍थेस भेट स्‍वरूपात द्यावे अशी योजना सुरू केली. मदतीसाठी शासन दरबारी पाठवलेल्‍या पत्रांना केराच्‍या टोपलीत जागा मिळाली तर एफएसआय, एसआरए, सेझ वगैरे बिल्‍डर आणि उद्योगपतींची टक्‍केवारीचीच भाषा कळणा-या राजकीय पुढा-यांना या प्रकल्‍पाचे महत्‍त्‍वच कळले नाही (अपवाद फक्‍त नागपूरचे गिरीश गांधी आणि मुंबईच्‍या पूनम महाजन या दोघांनी वर्गणी भरली.) श्रीमंत वर्गाकडूनही दमडी मिळाली नाही. आपल्‍या साहित्‍यातून आणि व्‍यासपीठांवरील भाषणातून सामाजिक बांधलकीचे डोस श्रोत्‍यांना आणि वाचकांना पाजणा-या विचारवंत आणि साहित्यिकांचाहि हात या प्रकल्‍पाला मदत करण्‍यासाठी आपल्‍या खिशात गेला नाही (अपवाद फक्त प्रा. वीणा देव- त्‍यांनी दोन अंध मुलींना अंक पाठवण्‍यासाठी वर्गणी भरली). ...आणि तरीही निधी उभा राहिला तो महागाईची वाढती झळ सोसत असतानाही ज्‍यांची मनं आणि सामाजिक जाणिवा जिवंत आहेत अशा मध्‍यमवर्गीयांकडून. यामध्‍ये साठ वर्षांच्‍या खानावळ चालवणा-या नाशिकच्‍या गोदामावशी जशा आहेत तशीच आपल्‍या मित्र-मैत्रिणींकडून खाऊचे पैसे गोळा करून पाठवणारी सातवीतील मुंबईतील गार्गीदेखील आहे.
     १५ फेब्रुवारी २००८ रोजी ‘स्‍पर्शज्ञान’ हे ब्रेल लिपीतील पहिले पाक्षिक वृत्‍तपत्र सुरू झाले आणि अंध बांधवांना वृत्‍तपत्रसृष्‍टीची दारे उघडी झाली. काय असते या ‘स्‍पर्शज्ञान’मध्‍ये असा प्रश्‍न आपणास पडला असेल. या अंकात पंधरा दिवसांतील महत्‍त्‍वाच्‍या बातम्‍या, राजकीय-सामाजिक घडामोडींचे विश्‍लेषण करणारे अभिनंदन थोरात आणि उदय कुलकर्णी यांचे लेख; कोकण, विदर्भ, मराठवाडा, खान्‍देश, उत्‍तर महाराष्‍ट्र, पश्चिम महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्‍ट्र इत्‍यादी प्रादेशिक वार्तापत्रे, नाट्य-चित्रपट परीक्षण, प्रेरणादायी संस्‍था-व्‍यक्‍ती यांच्‍यावरील लेख, प्रत्‍येक जिल्‍ह्याची सर्वांगीण माहिती देणारी सोनाली नवांगुळ यांची लेखमाला (सोनाली ‘स्‍पर्शज्ञान’ची उपसंपादिकाही आहे.) परदेशवार्ता, क्रीडावार्ता, विज्ञानविषयक लेख, डॉ. सुनीता पोवार यांचा आरोग्‍य सल्‍ला, निरुपमा जोशी यांच्‍या पाककृती, रेश्‍मा जठार-हरयाण यांची सामान्‍यज्ञान प्रश्‍नमंजुषा, असे भरगच्‍च व उपयुक्‍त साहित्‍य असले तरी ‘स्‍पर्शज्ञान’मध्‍ये तीन गोष्‍टींना थारा नाही. क्रिकेट, गुन्‍हेगारीच्‍या बातम्‍या आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणा-या बातम्‍या. (माझ्यासमोर प्रबोधनकारांचा आदर्श आहे).
स्‍पर्शज्ञानचे दिवाळी अंकही त्‍यातील दर्जेदारसाहित्‍यामुळे चांगलेच गाजत आहेत. २००८ सालचा दिवाळी अंक स्‍तंभलेखन विशेषांक काढला होता. त्‍यात गोपाळ गणेश आगरकरांपासून आत्‍ताच्‍या राजू परूळेकरांपर्यंत ३२ नामांकित स्‍तंभलेखकांचे निवडक लेख प्रसिध्‍द केले होते. या दिवाळी अंकास उत्‍कृष्‍ट दिवाळी अंकाचे राज्‍य पातळीवरील ५ पुरस्‍कार मिळाले आहेत. २००९ सालचा दिवाळी अंक जंगल- प्राणि, पक्षी, वनस्‍पती आणि आपण हा विशेषांक काढला होता. त्‍यामधे डॉ. माधव गाडगीळ, मारुती चितमपल्‍ली,  किरण पुरंदरे अशा २२ नामवंत वन्‍यजीव अभ्‍यासक व पर्यावरण तज्ञांचे लेख आहेत. या ही दिवाळी अंकाला राज्‍य पातळीवरील ३ पुरस्‍कार मिळाले आहेत. हे सर्व पुरस्‍कार खुल्‍या स्पर्धेतील इतर नामवंत दिवाळी अंकांवर मात करून मिळाले आहेत ही आमच्‍या दृष्टिने अभिमानाची बाब आहे.
आज महाराष्‍ट्रातील ३५ पैकी ३१ जिल्‍ह्यातील ३०० संस्‍था आणि व्‍यक्तिंना स्‍पर्शज्ञानचे अंक पोस्‍टाने पाठवले जातात. १ अंक सरासरी ६० पेक्षा जास्‍त अंध वाचक वाचतात. अशारितीने स्पर्शज्ञानची वाचक संख्‍या १८ हजारांपेक्षा जास्‍त आहे.
‘स्‍पर्शज्ञान’ वाचून प्रेरणा मिळालेले अनुजा संखे, हर्षद जाधव, राधा बाखले आणि गणेश नाईक हे चार अंध विद्यार्थी पत्रकारितेचा अभ्‍यासक्रम पूर्ण करून सक्रिय पत्रकारितेत कार्य करण्‍यास सज्‍ज झाले आहेत, तर राजेंद्र बडगुजर या अंध तरुणाला लोकसेवा आयोगाच्‍या स्‍पर्धापरीक्षांची तयारी करण्‍यासाठी ‘स्‍पर्शज्ञान’चा खूप उपयोग होत आहे. ही आहेत काही प्रतिनिधिक उदाहरणे. आज ब्रेल लिपीतील अभ्‍यासक्रमाची पुस्‍तके व इतर साहित्‍य निर्माण होण्‍यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्‍लाइंड आणि राष्‍ट्रीय दृष्‍टीहीन संघ यांसारख्‍या संस्‍थांबरोबरच पुण्‍याच्‍या सरोज टोळ, मीरा बडवे, उमेश जेरे, ठाण्‍याच्‍या सुखदा पंत आदी अनेक जण आपापल्‍या परीने प्रयत्‍न करीत आहेत. या सर्वांच्‍या पाठीशी शासन उभे राहो अथवा न राहो, आपल्‍यासारखे सहृदय वाचक उभे राहिले तरी अंधांच्‍या जीवनात ज्ञानाचा दीप तेवत ठेवणे शक्‍य होणार आहे..
- स्‍वागत थोरात
संपादक, स्‍पर्शज्ञान.
९४२२३१७९७९ / ९२२३२१७५६८.
sprshdnyan@gmail.com